‘मैत्री’साठी महापालिकेत जनसंपर्क अधिकारी नियुक्तीचा घाट…

0 2

कोल्हापूर (सरदार करले) : ‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा’ या ‘दोस्ताना’ चित्रपटातील गाण्याची आठवण होईल, असे महापालिकेत घडते आहे. केवळ दोस्ती निभावण्यासाठी अधिकाराचा वापर करून सेवानिवृत्त मित्राला महापालिकेच्या सेवेत घेण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

महापालिकेकडील जनसंपर्क अधिकाऱ्याचे पद नेहमीच आकर्षणाचे आणि वादाचे ठरले आहे. काहीवेळा जनसंपर्क अधिकारी निवडीवरुन वाद न्यायालयातही गेला आहे. सध्या हे पद रिक्त असले, तरी या पदाचा पदभार शैक्षणिक अर्हतेसह अन्य अटी, शर्तींची पूर्तता करणाऱ्या मोहन सूर्यवंशी यांच्याकडे आहे. ते पदावर मागील पाच वर्षांपासून प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. वास्तविक, या पदासाठी २०१६-१७ मध्ये अर्ज मागवले आहेत. पण निवडीची प्रक्रिया रखडली आहे. त्याचे कारण गुलदस्त्यातच आहे.  

आयुक्त डॉ. एम.एस. कलशेट्टी यांचे एक जिवलग मित्र माहिती संचालनालयातून नुकतेच निवृत्त झाले आहेत. या दोघांनी एकत्र काम केल्याचे सांगितले जाते. निवृत्तीनंतर त्यांना महापालिकेच्या सेवेत जनसंपर्क अधिकारी पदावर घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. या संबंधीची जाहिरात वृत्तपत्रातून आणि ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहे. १ जून रोजी या पदासाठी मुलाखती होणार आहेत.

तीस हजार रुपये रोख इतक्या ठोक मानधनावर ही जागा भरली जाणार आहे. त्यातही मित्राच्या सोयीसाठी ‘शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांना प्राधान्य’ अशी खोचक अट या जाहिरातीत घालण्यात आली आहे. महासभेमध्ये झालेल्या ठरावानुसार या पदावर स्थानिक कर्मचाऱ्यांतून वर्णी लावावी, असे धोरण ठरले आहे. सध्या ही जबाबदारी सांभाळणारा प्रभारी का होईना अधिकारी असल्याने ठोक मानधनावर हे पद भरण्याची गरज नसल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र केवळ मैत्री निभावण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. काही पदाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव थांबावा यासाठी प्रयत्न केला, पण आपली कामे थांबतील या भीतीने त्यांनीही याकडे कानाडोळा केला आहे.

महापालिका कर्मचारी संघटनेने या भरतीला विरोध केला असून तसे पत्र आयुक्तांना दिले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. हे पद ठोक मानधनावर भरल्यास दरमहा ३० हजार रुपये म्हणजेच वर्षाला साडेतीन लाख रुपयांचा बोजा महापालिकेवर पडणार आहे. या भरतीची खरोखरच गरज आहे का, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे. केवळ मित्राला शब्द दिला आहे, काही महिन्यांसाठी त्यांना संधी देऊ, असे सांगून या भरतीचे समर्थन केले जात आहे. मात्र ही भरती निश्चितच वादग्रस्त ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More