माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली…

0 1

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे काल (शनिवार) निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक नेत्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यात विरोधीपक्ष नेत्यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनमध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांना संबोधित करताना माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ‘माझ्या मनात मोठं दुःख आहे. मी इतक्या दूरवर आहे आणि माझा जवळचा मित्र मला सोडून गेला’असे ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, खूप कठीण प्रसंग आहे. एकीकडे मी कर्तव्यांनी आणि दुसरीकडे भावनांनी बांधलो गेलो आहे. अरुण जेटली आता आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाहीय. काही दिवसापूर्वी बहीण सुषमा स्वराज सोडून गेल्या आणि आता सोबत असणारा मित्रदेखील गेला. मी बहरीनमधून अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो ही प्रार्थना करतो.

भाजप अध्यक्ष अमित शहा : भाजप अध्यक्ष अमित शहा यांना अरुण जेटली यांच्या निधनाने धक्का बसला असून ते भावूक झालेले पाहायला मिळाले. ‘माझ्या खासगी आयुष्यात जेव्हा संकटांचा सामना करावा लागला तेव्हा अरुणजी माझ्या सोबत होते. त्यांनी मला धैर्य दिले आणि माझे धाडस वाढवले. माझ्या कुटुंबाचे मनोबलही त्यांनी वाढवले. देव त्यांच्या कुटुंबाला आणि भाजपच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची ताकद देवो, अशा शब्दात अमित शहा यांनी आपले दु:ख व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार : भाजपाचे दिग्गज नेते श्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मनापासून दु: खी झालो आहे. आम्ही एक चतुर संसदपटू, उत्साही वाचक आणि एक दयाळू नेता गमावला आहे. मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांचा आत्म्याला शांती लाभो, अशा शब्दात शरद पवार यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी : अरुण जेटली हे पक्षातील महत्त्वाची व्यक्ती होते. अत्यंत क्लिष्ट मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी पक्ष त्यांचावर अवलंबून होता, असे ते म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील : अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली यासारखे विद्वान व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणे हे देशाला आणि पक्षाला नजर लागली आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व्यक्त केले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे योगदान भारतीय जनतेच्या स्मरणात राहणार असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग : अरुण जेटली हे एक प्रथितयश वकील, उत्तम वक्ते, अतिशय चांगले प्रशासक आणि उत्कृष्ट संसदपटू होते. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी ते चांगल्या प्रकारे संवाद साधू शकत. ते भाजपचा आदरणीय व सुसंस्कृत चेहरा होते, असे डॉ. सिंग म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री आणि स्वतःच्या उत्तम संवादशैलीने संसदेतील चर्चांमध्ये जिवंतपणा आणणारे श्री. अरुण जेटली ह्यांचं निधन झालं. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.  

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात आणण्यात आले. येथून त्यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात होईल. दुपारनंतर त्यांच्यावर बोधघाटावर राजकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More