दिनकरराव जाधव गटाचा संजय मंडलिक यांना पाठिंबा : सत्यजित जाधव

0 4

गारगोटी (प्रतिनिधी) : माजी आमदार दिनकरराव जाधव व जाधव कुटुंबाकडून सर्वसामान्य व गरीब कुटुंबालाच नेहमी न्याय मिळाला. आम्ही मंडळी काँग्रेसवर प्रेम करणारी पण महाडिक यांनी काय विकास केला ? त्यांना पाच वर्षे आमची आठवण झाली नाही. आता या निवडणुकीत आम्ही दिनकरराव जाधव गटाचे कार्यकर्ते संजय मंडलिक यांना पाठिंबा देणार असल्याचे सत्यजित जाधव यांनी जाहीर केले. ते आज (बुधवार) गारगोटी (ता. भुदरगड) येथे गणेश भवन येथे आयोजित जाधव गटाच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी प्रा. संजय मंडलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सत्यजित जाधव म्हणाले की, सदाशिवराव मंडलिक व दिनकरराव जाधव यांचे गेली चाळीस वर्षांचे जवळचे नाते होते. मंडलिक साहेबांचा आदर्श घेण्याजोगा आहे. आणि जे आम्हाला आघाडी धर्म पाळण्यास सांगत आहेत, त्यांना आमची पाच वर्षात कधीच आठवलो नाही. त्यांनी आम्हाला गोकुळ निवडणुकीवेळी डावलले, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिनकरराव जाधव यांच्या सुनेला पाडण्याचा प्रयत्न केला. मग आज आम्ही का त्यांना विरोध करायचा नाही ? दिनकरराव जाधव यांनी ज्यांना मदत केली त्यांना निवडून आणले. तसेच संजय मंडलिक जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांचे काम मी स्वतः बघितले आहे व त्याचा साक्षीदार ही आहे. त्यामुळे आता सर्वांनी संजय मंडलिक यांना मदत करायची, घड्याळाकडे बघायचे सुध्दा नाही असे आवाहनही त्यांनी केले.

त्यानंतर संजय मंडलिक म्हणाले की, गेली ६६ वर्षे जाधव गट सामाजिक व राजकीय कार्यांत सहभागी आहे. मंडलिक साहेब व जाधव साहेबांमध्ये स्नेह व मैत्री होती. मीही तसाच स्नेह जिव्हाळा जाधव कुटुंबाशी जपेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच मागच्या वेळी ज्यांना संधी दिली होती त्यांनी ती वाया घालवली त्यांना ग्रामीण भागामध्ये लक्ष द्यायला वेळच नाही. ते फिरकलेच नाहीत. ते स्वतःला संसदरत्न  समजतात. पण संसदरत्न ही एक खाजगी एजन्सी आहे. जर अशा पध्दतीने संसदरत्न मिळविण्यापेक्षा विकास केला असता तर ही वेळ आलीच नसती अशी टीका त्यांनी धनंजय महाडिक यांच्यावर केली. तर दिनकरराव व सत्यजित जाधव गटाच्या पाठिंब्यामुळे मला दहा हत्तीचे बळ मिळाले असे ते म्हणाले. 

या वेळी हणमंत शेठजी, नंदू जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. या मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी जाधव, प्रविण चौगुले, अरविंद पाटील, धर्मा कांबळे, आर.डी.पाटील, प्रकाश पाटील, संजय शेळके, युवराज जाधव, हिंदुराव जाधव, सागर साळुंखे, सागर खामकर, डी.एस.कुंभार, शामराव भांदिगरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये दिलीप गुरव यांनी स्वागत, शहाजी देसाई यांनी प्रास्ताविक केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More