आता सुरू होतेय कसोटी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा !

0 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची लोकप्रियता जशी वाढत गेली तशी कसोटी क्रिकेटला घरघर लागली.  कसोटी क्रिकेटला पुन्हा लोकप्रियता मिळवून देण्यासाठी आयसीसीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता कसोटी क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. आयसीसी कसोटी वर्ल्ड कपला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या अॅशेस मालिकेपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून २०२१ पर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. आयसीसीनं ट्विटरवरून ही माहिती दिलीय.

पुढच्या दोन वर्षात २७ मालिकांमध्ये ७१ कसोटी सामने होणार आहे. त्यानंतर क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी चॅम्पियन संघ मिळणार आहे. मात्र या वर्ल्ड कपचे नियम एकदिवसीय वर्ल्ड कपपेक्षा वेगळे असणार आहेत. एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कप प्रमाणे खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचे नाव आणि जर्सी नंबर असणार आहे. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या जर्सीचा वापर केला जात होता. वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ ३ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. यात २ कसोटी सामन्यांचाही समावेश आहे. या मालिकेसोबत भारताचे टेस्ट चॅम्पियनशीप अभियान सुरू होणार आहे.

या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप ९ संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. मालिका २ ते ५ सामन्यांची असू शकते. यात प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला १२० गुण मिळणार आहेत. दरम्यान गुण हे प्रत्येक सामन्यावर दिले जातील, मालिकेवर असणार नाहीत. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड हे संघ भाग घेतील. झिम्बाब्वे संघाला आयसीसीने निलंबित केल्यामुळे ते या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाहीत.

या स्पर्धेअंती ज्या दोन संघांकडे जास्त गुण असतील ते संघ २०२१ मध्ये इंग्लंडमध्ये अंतिम सामना खेळतील. अंतिम सामना जिंकणारा संघ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात पहिले टेस्ट वर्ल्ड कप विजेतेपद मिळवेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More